धनंजय महाडिक युवाशक्तीची यावर्षी तीन लाखाची दहीहंडी
schedule14 Aug 22 person by visibility 1690 categoryक्रीडा
असित बनगे : आवाज इंडिया प्रतिनिधी
कोल्हापूर : महापूर आणि कोरोना संसर्गामुळे गेली तीन वर्षे युवाशक्ती दहीहंडीच्या आयोजन झाले नव्हते .आता मात्र कोविड संसर्ग ओसरला आहे. दुसरीकडे राज्य शासनाने सर्व सण- उत्सवावरील निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे या वर्षी पुन्हा एकदा धनंजय महाडिक युवाशक्तीच्या वतीने दहीहंडीचा थरार आणि जल्लोष रंगणार आहे.अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शुक्रवार 19 ऑगस्ट 2022 रोजी युवाशक्ती दहीहंडी स्पर्धा आयोजित केली आहे. कोल्हापुरातील दसरा चौक मैदान येथे तब्बल 3 लाख रुपयांची दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांची चुरस रंगणार आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या वतीने दहीहंडी स्पर्धेमधील विजेत्या गोविंदा संघाला रोख 3 लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. शिवाय युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला प्रोत्साहन देण्यासाठी अन्य बक्षिसांचा वर्षाव केला जाईल.
पहिल्याच प्रयत्नात पाच थर रचून सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला 5 हजार रुपये आणि सहा थर रचून सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला 10 हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच सर्वात वरच्या थरावर चढून दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदाच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आली आहे .त्यासाठी समीट एडव्हेंचरचे विनोद कांबोज आणि हिल रायडर्सचे प्रमोद पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे .दहीहंडी फोडणारा गोविंदा चौदा वर्षावरील असावा, या नियमाचे काटेकोर पालन केले जाईल शिवाय महिला गोविंदा पथकांना 25 हजार रुपयांचे विशेष प्रोत्साहनपर पारितोषिक दिले जाणार आहे.
दसरा चौक मैदानावर दहीहंडीसाठी शिस्तबद्ध नियोजन केले जाणार आहे.वैद्यकीय पथक ,रुग्णवाहिका सेवा उपलब्ध असणार आहे.महिला आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था असणार आहे.कलाकारांचा नृत्याविष्कार आणि ढोल - ताशा पथकाचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमाला महादेवराव महाडिक,जिल्ह्यातील सर्व आमदार ,जिल्हाधिकारी,अन्य अधिकारी,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे.या स्पर्धेला बालाजी कलेक्शन ,काले बजाज, समृद्धी सोलर आणि साजणीचे अमित ट्रेडर्स हे प्रायोजक आहेत. दहीहंडी स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी कोल्हापूरवासीयांनी 19 ऑगस्टला चार वाजता दसरा चौकात उपस्थित राहावे ,असे आवाहन खासदार महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे.