Awaj India
Register

जाहिरात

 

उंचगावमध्ये सतेज पाटील गटाला आणखी एक धक्का

schedule22 Feb 24 person by visibility 1035 category

*काँग्रेस-शिवसेना (उबाठा) गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश*
कोल्हापूर ;
            उंचगाव इथल्या सतेज पाटील समर्थकांनी तसेच शिवसेना (उबाठा) गटाच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. लेटस ग्रुपचे अध्यक्ष गणेश जाधव यांनी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. सतेज पाटील गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. माजी आमदार अमल महाडिक यांची कार्यपद्धती आणि नेतृत्वगुणांवर विश्वास ठेवून आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचे जाधव यांनी सांगितले. 

          उचगाव येथे नमो चषक अंतर्गत कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेदरम्यान जाधव आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी सतेज पाटील गटाला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे. 

             कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये अमल महाडिक पदावर नसतानाही विकास कामे करत आहेत आणि काँग्रेसचे नेते मात्र केवळ टीकाटिप्पणी आणि अडवणूक करण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उचगाव मधून अमल महाडिक यांना विक्रमी मताधिक्य मिळवून देऊ असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला. 

             अमल महाडिक यांच्या हस्ते या सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना माजी आमदार अमल महाडिक यांनी विकास कामांच्या माध्यमातून विरोधकांच्या टीकेला उत्तर देत असल्यामुळेच अनेकजण आपल्या सोबत येत आहेत, असे मत व्यक्त केले. केवळ विरोधासाठी विरोध करणे आमची संस्कृती नाही अशी उपरोधिक टीका महाडिक यांनी सतेज पाटील यांचे नाव न घेता केली. 

          कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जनता सुज्ञ असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निश्चितच आपल्या पाठीशी जनता भक्कमपणे उभे राहील असा विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला.यावेळी ऋषिकेश कांबळे, अभिजीत सावंत, गणेश मस्कर, पिंटू तिरुके, अक्षय परीट, दीपक अंगज, गणेश पोवार, अक्षय गावडे, रोहित धामणे यांच्यासह अन्य कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes