Awaj India
Register

जाहिरात

 

इतका कसला राग…की लेकीचा जीवच घ्यावा?

schedule25 Jul 20 person by visibility 1046 categoryसामाजिकगुन्हे

इतका कसला राग…की लेकीचा जीवच घ्यावा?

 आवाज इंडिया न्यूज

अनुराधा कदम

अंगणात खेळणारी लेक पाणी प्यायला घरी आली म्हणून बापाला राग आला…त्याने सहा वर्षाच्या चिमुरड्या लेकीच्या कानशिलात लावली…अनपेक्षित बसलेल्या या माराने ती भिंतीवर आदळली… घाव वर्मी लागल्याने तिचा जीव गेला. चार वाक्यात अवघ्या सहा वर्षाच्या अनन्याच्या मृत्यूची ही दुर्दैवी कथा. काय दोष होता तिचा? पहिला दोष तर हाच की ती मुलगी होती. ?आणि दुसरा दोष हा की ती सतत बापाला घाबरून रहायची. ? म्हणूनच तहान लागली म्हणून पाण्याचा घोट घेण्यासाठी येताना वडीलांना बघून घाबरल्याचा राग आल्याने बापाने तिच्याच श्वासाचा घोट घेतला. इतकं दुस्वास करण्यासारखं त्या निरागस जीवानं काय केलं? आयुष्याच्या फक्त सहाव्या वर्षात पाऊल टाकलेल्या लेकीवर रागापोटी हात उगारणाऱ्या या बापाने जगातल्या बापलेकीच्या सुंदर नात्याचाही गळा घोटला.
कोल्हापुरात अशी घटना घडावी याचीही लाज वाटते…नाही नाही, अशी घटना जगातील कोणत्याच घरात घडू नये. कसबा बावड्यात जयभवानी गल्लीत राहणाऱ्या अनन्या तानाजी मंगे हिच्या आयुष्याचा असा शेवट जन्मदात्या बापाकडून व्हावा ही बापाचं काळीज व मन किती निष्ठूर होत आहे हे सांगणारी घटना आहे. अनन्याच्या डोक्यातून रक्ताची धार लागल्यानंतर आईने केलेला आक्रोश आणि नवऱ्याच्या अंगावर धावून जाण्याची तिची धडपड हे सगळच दृश्य अंगावर काटा आणि मनावर चरे पाडणारं होतं. शनिवारी ही घटना घडली. शुक्रवारी अन्यन्या तिच्या आईबाबांसोबत बावड्यातील दत्तमंदिरात गेली होती. रोजच्या जगण्याशी सामना करणारं सर्वसामान्य कुटुंब होतं हे. आज बापाच्या रागापोटी काय झालं… मुलगी कायमची गेली…बाप तुरूंगात गेला आणि आईचं तर जगच उध्वस्त झालं. आता कारणांच्या मुळाशी जाताना बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत .अनन्या हट्टी होती... जेवणार नाही ही असा हट्ट करत होती.. दोन वर्षापूर्वी खेळताना पडल्यानंतर तिला सतत चक्कर येत होती ... त्यातूनही तिचा हट्टीपणा वाढला होता असा तिचा बाप सांगत आहे. कारणं काहीही असोत बापाच्या रागाने लेकीचा मात्र जीव गेलाच.
खरं तर सहा वर्षाच्या लेकीनं बापाकडे मनसोक्त हट्ट करावा… बापाच्या ताटातला घास भरवून घ्यावा…त्याच्या पाठीवर कोकरू होऊन घरभर हुंदडावं. त्याच्या अंगाखांद्यावर खेळावं. भातुकलीत केलेल्या खोट्याखोट्या भाताचा घास बापाला भरवावा. शाळेत काढलेलं चित्रं हौसेनं दाखवावं…नाच करावा, गाणं म्हणावं. पण यातलं काहीच तानाजीमधील बापाने अनुभवलं नाही. उलट अनन्या सतत तानाजीमधल्या बापाच्या वठारलेल्या डोळ्यांनी गांगरून जायची. बाबा घरी असल्यावर तिचं बालपणच विसरायची. आईच्या पदरामागे लपायची. मुलगी झाल्याचा राग तानाजीच्या मनात वाढतच होता. शनिवारीही घराच्या दारात खेळणाऱ्या अनन्याला तहान लागली म्हणून ती पाणी प्यायला घरात आली. पण घराच्या सोप्यात बापाला पाहून घाबरत घाबरत आत जायला लागली तसा तानाजी चिडला. उठला आणि तडक तिच्या कानशिलात लगावली आणि ती गतप्राण झाली.
माणसाला जशा अनेक भावभावना असतात तसाच रागही असतो हे मान्य. पण रागाच्या भरात जर पोटच्या गोळ्याचा जीव घेण्यापर्यंत मजल जात असेल तर अशा रागाला काय म्हणावे. मुलगी आहे म्हणून सुरूवातीची नाराजी, नंतर दुस्वास आणि नंतर रागाचे रूप धारण करत असेल तर असे बाप हा कुटुंबाचा आधार, कर्ता असे म्हणण्याचे धाडस का करावे… तानाजी मंगे याने केलेले कृत्य एका क्षणाचे असेल पण त्यातून खूप मोठा सामाजिक प्रश्न आणि कौटुंबिक पेच निर्माण झाला आहे. तानाजीचा मुलीविषयीचा राग उफाळून आला…तो त्याच्या वर्तनातून दिसला. पण आजही समाजात असे अनेक बाप आहेत जे लेकीची जीवंतपणी घुसमट करत असतात. शिकण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात. कोणतीही शहानिशा न करता तिला योग्य नसलेल्या मुलाशी लग्न लावून देतात. सासरी त्रास झालाच तर स्वत:च्या प्रतिष्ठेपायी तिलाच दूर लोटतात. मुलगी बोलत नाहीत…आईही शब्द गिळते… मोठेपणाची झूल पांघरलेले बाप मात्र मिरवत राहतात समाजात… लेकीचा बाप होण्यात काय श्रीमंती असते हे माहितीच नसते त्यांना. ज्याने जन्म दिला तोच मृत्यूला जबाबदार ठरला अशा दुर्दैवी लेक अनन्याचा मृत्यू बापलेकीच्या नात्याची वीण उसवून गेला.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes